Thursday, 20 September 2012

संपादकीय - सप्टेंबर 2012


श्री गणेशाच्या स्वागताची सर्वत्र उत्साहानी तयारी सुरू असतानाच नुकतेच पुणे येथे पोलीसांनी तरूण-तरूणींच्या मद्यधुंद पार्टीवर छापा घालून शेकडो तरूणांना अटक केली. हे सर्व विशी – पंचविशीतील मुले आपला नोकरी- व्यवसायातील ताण घालविण्याकरीता (?) ही पार्टी करीत असल्याचे सांगितले जाते. यापेक्षाही गंभीर प्रकार त्याच्या दोन दिवस आधी उघडकीस आला. तो म्हणजे, शाळकरी मुलांची ‘‘फ्रेशर्स पार्टी’’ उर्फ ‘‘चिल्लर पार्टी’’. दहावीतील विद्यार्थ्यांना निरोप देण्याकरीता या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याहुन धक्कादायक बाब, या पार्टीत आठवी व नववी इयत्तेमधील विद्यार्थीदेखील सामील झाले होते. एका पाठोपाठ एक घडलेल्या या घटनांमुळे जनमानस ढवळुन निघाले. समाजातील वाढती व्यसनाधिनता हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. पाश्चात्य जीवनशैलीचे अंधानुकरण, बेधुंद जीवनशैली, विभक्त कुटुंबामुळे नवरा/बायकोवर येणारा ताण याला कारणीभूत ठरत आहे. दैनंदिन जीवनात भेडसावणार्‍या समस्यांना तोंड देण्यासाठी लागणारी कणखर मानसिकता कमी पडते आहे. वाढती महागाई, वाढते शैक्षणिक खर्च याचा ताण विभक्त कुटुंबात जास्त ताण येतो, तो निवारण्यासाठी दोघांनीही नोकरी / व्यवसाय करणे भाग पडते. परंतू, यामुळे मुलांना वेळ देणे, त्यांच्याशी संवाद साधणे दोघांनाही शक्य होत नाही. कुटुंबातला संवाद थांबलेला आहे. आपआपले ताण कुटुंबियांशी बोलुन मन मोकळे करून त्यावर मार्ग काढणे, यापेक्षा अशा पार्ट्यांमधे सामील होण्याचा वेडेपणा मुलांकडून घडतो. या समस्येवर मात करण्यासाठी शक्यतो एकत्र कुटुंब पध्दतीचा अवलंब करावा. मुलांना पुरेसा वेळ द्यावा, त्यांच्याशी संवाद साधावा. केवळ चांगली शाळा, महागडे क्लासेस, वारेमाप पैसे दिल्याने भागत नसून, मुलांची भावनिक गरज ओळखणे आणि ती पूर्ण करणे, हे अत्यावश्यक आहे. सध्याची पिढी हुशार आहे, कर्तबगार आहे, ती यातून नक्कीच मार्ग काढेल, याची खात्री आहे.
     दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून हा उत्सव साजरा करण्याच्या पध्दतीत काही सकारात्मक बदल होत आहेत, पण त्याचे प्रमाण अल्प आहे. गणेश मंडळांकडून सकारात्मक कार्याची अपेक्षा समाजाला आहे. भव्य देखाव्यांची महागडी स्पर्धा, कर्कश्य आवाजाची डॉल्बी साउंड सिस्टीम, दणकेबाज मिरवणुकीवर होणारा भरमसाठ खर्च यासर्व खर्चांवर नियंत्रण आणून तो पैसा समाजहिताकरीता वापरावा, अशी रास्त अपेक्षा आहे. काही मंडळांनी अशी सुरूवात केली असली तरी हे प्रमाण अत्यल्प आहे. यात वाढ व्हावी व गणेशोत्सवाला त्याचे मूळ वैभव प्राप्त व्हावे.
     दहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर या उत्सवावर दहशतवादाचे सावट असणार आहे. सुरक्षा यंत्रणा, गणेश मंडळ तसेच नागरिकांनी योग्य ती काळजी घेतल्यास, सावधानता बाळगल्यास अशा घटनांना नक्कीच आळा घालता येईल. कार्य सिध्दीस नेण्यास श्री गजानन समर्थ आहेत.


Thursday, 28 June 2012

द्विजाची कैफियत - कवी योगेश




हल्ली मी दहशत वाद्यांच्या विरोधात बोलायचे टाळतो,
कारण बुरसटलेली विचारसरणी अशी हेटाळणी होईल
हल्ली मी आंदोलनात भाग घ्यायचे टाळतो,
कारण आंदोलनाचा पाठिंबा कमी होईल
हल्ली मी आरक्षणावर बोलायचे टाळतो,
कारण राजकारणी त्याचा फायदा घेतील
हल्ली मी समाजसुधारकांचे नाव ही घ्यायचे टाळतो,
कारण खोटा इतिहास सांगण्याचा खटला होईल
हल्ली मी टिळक, सावरकरांचे लिखाण वाचणे टाळतो,
कारण सनातनी विचारांचा शिक्का बसून जाईल
हल्ली मी सभ्य, सुसंस्कृत पणे बोलणे टाळतो,
कारण त्याला नपुंसकता समजले जाईल
हल्ली मी समाजसेवा करण्याचे टाळतो
कारण त्यातच आमच्या घरांची बरबादी, कुटुंबांची ससेहोलपट झाली
हल्ली मी आडनाव घ्यायचे टाळतो,
कारण त्यातून माझी जात ओळखली जाईल
हल्ली मी चारचौघात विचार मांडणे टाळतो,
कारण त्यात कुणालाही जातीय कावा दिसतो
हल्ली मी देशभक्तीच्या घोषणा देणे टाळतो,
कारण त्यात संघाचा प्रभाव दिसतो
नाही दादोजींना इमान, रामदासांना चारित्र्य,
शहिदांची जात येते वृत्तपत्रात मात्र
हळू बोला,आपल्या जातीचे नाव कुणी घेवू नका,
कृष्णाजीशिवाय कोणाचाही वारसदार स्वतःला मानू नका
आम्हाला शिव्या दिल्या शिवाय इतर मागासलेले ठरत नाहीत,
रात्री पुतळे हलवल्याशिवाय भ्रष्टाचारावरून जनतेचे चित्त हटत नाही
ही जात इतकी बदनाम कशी,प्रश्न मला पडला आहे,
जातीयतेच्या राजकारणात सारा देश सारा देश सडला आहे
जरी म्हटलं या साऱ्या अफवा खोट्या आहेत,
पण विषमता मिटली तरी आमच्या मनात मोठ्या दऱ्या आहेत
आमचा जप करून पोट काहींचे भरते यात आनंद आहे,
शेवटी त्यांच्या कडेही द्यायला शिव्या उरत नाहीत
आतातर यासाठी विशेष धर्म, संघटना निघाल्या आहेत,
भावी देशासाठी त्यांच्या आपापल्या घटना निघाल्या आहेत
त्यांच्या या घटनांमध्ये एका जातीला स्थान नाही,
म्हणून तिथे कवी कलशाला उल्लेखाचा ही मान नाही
काय करणार शेवटी ही जातच बदनाम आहे,
मान वर करून चालण्याची आमची काय बिशाद आहे
धर्म तोडणार्यांना, सत्ताधीशांना आगीत तेल ओतावे लागते,
त्यांच्या कडेही दुसरा फायद्याचा उपाय नाही
वाघ, सिंहाच्या वाटेला कुणी भक्त जातो काय,
यज्ञात बळी होतो बकरा, राजकारणात कोण होते पाहा,
धरली तर चावते, सोडली तर पळते अशी ही जात आहे,
ही तर कट्टरतेची माणुसकी वर मात आहे
स्वातंत्र्यानंतरही घरे जळाल्यावर आम्ही मागे हटलो आहोत,
समाजसेवा,परमार्थ करण्याला घाबरू लागलो आहोत
सोडा आता विचार सारे, पूर्वजांच्या चुका पुन्हा करू नका,
अहंगंडाच्या कोशात राहून वाट वाकडी धरू नका
जिभेवर असली सरस्वती तरी सत्य बोलावत नाही,
मानाने जगण्याचा हक्क ही आम्ही मागत नाही
आम्हाला आदर न दिल्याने समाज कुठे चालला आहे,
शिक्षणात पावित्र्य, समाजात नैतिकता, राजकारणात सौजन्याची ऐशी तैशी,
जीवनात रामापेक्षा दामाची जागा झाली मोठी
द्वेषाला द्वेषाने आम्ही उत्तर देत नाही,
द्वेषाचा धंदा करणार्यांचे दुकान बंद होत नाही
वोट बँक बनवल्याशिवाय प्रश्न कधी सुटणार नाहीत,
पैसा, सत्ता आल्याशिवाय समाजाला तुम्ही चांगले वाटणार नाहीत
शेंडी आणि जानव्याची ताकद अजून कमी झालेली नाही,
हार मानण्याइतकी परिस्थिती हाताबाहेर गेली नाही
सोडून सारे न्यूनगंड,हताशा, वर्तमानात जगूया,
गेली संकटे, झाल्या चुका, बदलण्याची वेळ आहे.
हिम्मतीने जगण्याचा हा काळ आहे.
उज्ज्वल भवितव्य घडवायचे आहे,
यश खेचून आणायचे आहे
होऊन गेला भूतकाळ, भविष्य बाकी आहे,
द्वेष कुणीही करो, राम आमच्या पाठीशी आहे

-
कवी योगेश

Tuesday, 5 June 2012

संपादकीय जुन 2012


पाश्चात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव, स्वैर वागणुक, वाढते कौटुंबिक कलह, आंतरजातीय तसेच आंतरधर्मीय विवाह हे ब्राह्मणांपुढील आव्हाने असल्याचे समाजधुरीणांचे मत आहे. पण निव्वळ ढासळते सांस्कृतीक मुल्य हाच एकमेव प्रश्न नसून मानवतेला काळीमा फासणार्‍या कृत्यामधेही ब्राह्मणांचा सहभाग वाढतो आहे. नुकतेच एका पाहणीतून गंभीर आणि संतापजनक सत्य नुकतेच समोर आले. गत काही काळापासून ‘स्त्रीभ्रूण हत्या’ हा विषय ऐरणीवर आला आहे. काही लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संस्थांव्दारे याविषयी जनजागृती मोहीम सुरू आहे. याविषयावर जागृत ब्राह्मण वर्गात असा समज होता की हे प्रकार फक्त इतर जाती-धर्मात आहेत, ब्राह्मण यापासून दूर आहेत. पण नुकत्याच एका पाहणीत या समजाला प्रचंड मोठा आणि धक्कादायक तडा गेला. या पाहणीच्या अहवालानुसार काही काळापुर्वी ब्राह्मण समाजात अल्प असलेले स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण नुकतेच 30 टक्क्यांनी वाढले आहे. उच्च व कनिष्ठ वर्गापेक्षा मध्यम वर्गात याचे लोण प्रचंड वेगानी वाढते आहे. हा निष्कर्ष अत्यंत चिंताजनक आहे. निसर्गाचे संतुलन नाकारणारे आपण कोण ? स्त्री-पुरूष टक्केवारी, सामाजिक संतुलन, विवाहाच्या समस्या आदी सामाजिक समस्या काही काळ बाजुला ठेऊ, मानवतेला काळीमा फासण्यार्‍या अशा घटनांमधे आपला सहभाग आहे हे सत्यच फार बोचरे आहे. निदान ब्राह्मणांकडुन तरी ही अपेक्षा नक्कीच नाही.
या गंभीर प्रश्नावर आपण नुसते चिंता व्यक्त करून किंवा आपल्याच लोकांवर तोंडसुख घेऊन चालणार नाही. यावर उपाययोजना करावी लागेल. आपल्या लोकांना या विघातक मानसिकतेतून बाहेर काढावे लागेल. जेष्ठ तसेच तरूण पिढीने संयुक्त कुटुंब पध्दती स्विकारण्याची तयारी करावी. एक कुटुंब-एक मुल ही संकल्पना दिसावयास गोंडस असली तरी त्याचे व्यावहारिक तोटे लक्षात घ्यायला हवे. अपत्यांची संख्या वाढवणे हे व्यावहारिक शहाणपणाणे लक्षण खचितच नाही म्हणुनच मुलांचा सांभाळ करणे, मुलांवर संस्कार करणे, त्यांना शिस्त लावणे आदी बाबींसाठी संयुक्त कुटुंब पध्दीताचा पुनःश्च स्विकार करणे हितावह ठरेल. यातही काही अडचणी आहेत, हे मान्य, पण कुटुंबानी एकत्र बसुन यावर मार्ग काढता येणे निश्चितच शक्य आहे.
सुरूवातीला नमुद केल्याप्रमाणे पाश्चात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव, स्वैर वागणुक, वाढते कौटुंबिक कलह, आंतरजातीय तसेच आंतरधर्मीय विवाह आदी सांस्कृतिक मुल्य ढासळत असल्याचे निदर्शक आहे. त्यावर कौटुंबिक समुपदेशन हा एकमेव मार्ग आहे. त्याकरीता जुनी तसेच नवीन पिढी एकत्र येणे गरजेचे आहे. सांस्कृतिक मुल्य जपणे तसेच हीन मानसिकतेची अशी कृत्ये आपल्या समाजात रोखण्यास सर्वांनी एकत्र येत मार्ग काढावा. सध्याच्या काळात सर्वांनी एकत्र येण्याची मानसिकता ब्राह्मणांमधे जाणवते आहे ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. आजवर ब्राह्मणांनी अनेक आघात सहन केले आहेत. या संकटावरही आपण एकत्र येऊन निश्चितच मात करू याची खात्री वाटते.
                                               
                                                                                                                            

Saturday, 28 April 2012

संपादकीय मे 2012


 ‘‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ’’, एक प्रभावशाली ब्राह्मण संघटना म्हणुन समोर येत आहे. नुकतेच 24 एप्रिल 2012 रोजी आपणां सर्वांच्या पाठींब्यानी तसेच सहकार्यानी ‘‘भगवान परशुराम जयंती’’ हा कार्यक्रम धुमधडाक्यानी साजरा करण्यात आला. ‘‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ’’ प्रामुख्यानी राष्ट्रीय स्तरावर ‘ब्राह्मण संघटन’ तसेच ब्राह्मण समाजाला भेडसावणार्‍या समस्या व आव्हान यांचे प्रभावीपणे निराकरण करणे, याकरीता कार्यरत आहे. ब्राह्मण समाजाचे एकत्रीकरण, सक्षमीकरण हे शाखा, उपशाखा, भाषा, प्रांत यापलीकडे जाऊन व्हावे, असे व्यापक उद्दीष्ट असले तरी ‘‘समाजनिर्मीतीतून राष्ट्रनिर्मीती’’ हे देखील ‘‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे’’ ध्येय आहे. आपला समाज प्रभावशाली झालाच पाहीजे पण त्यासोबतच राष्ट्रीय कर्तव्यदेखील कटाक्षाने पाळले गेले पाहिजे असा अ.भा.ब्रा.म.चा दृष्टीकोन आहे. यालाच अनुसरून 14 एप्रिल रोजी संविधानकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 124व्या जयंती निमीत्तानी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्यावतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संविधानकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला जगातील सर्वोत्तम संविधान दिले. संपूर्ण देशाला एकसुत्रात गुंफले. आज जगभरात भारतीय लोकशाहीचा जो नावलौकिक आहे त्याचे श्रेय या संविधानाला आहे. संविधानकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे हे ऋण एक भारतीय नागरिक म्हणुन आपण मानायलाच हवे. ज्या ज्या व्यक्तींनी या देशाकरीता भरीव कार्य केले आहे, त्यांचा योग्य वेळी यथोचित सन्मान व्हावा, यावर आमचा भर असेल. समाजकारण करीत असताना राष्ट्रकार्य दुर्लक्षित होता कामा नये. आज सर्व जाती-धर्मात तेढ निर्माण करणारे समाजशत्रू  डोके वर काढीत असताना आपल्या वैचारिक प्रगल्लभतेनी यावर मात करण्याकरीता, सामाजिक समरसता निर्माण होण्याकरिता ब्राह्मण समाजानी पुढाकार घेणे अपेक्षित आहे.
देशभरात विखुरलेला ब्राह्मण जर एक झाला तर काय होऊ शकेल, याची एक झलक काही दिवसांपुर्वी बघावयास मिळाली. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या कॉंग्रेस (आय) पक्षाच्या चिंतन बैठकीत पक्षाचे महासचिव श्री.राहुल गांधी यांनी ‘‘मी ब्राह्मण आणि कॉंग्रेसचा महासचिव आहे’’, असे विधान केले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानी तात्काळ श्री. गांधी यांच्याकडे याचा खुलासा मागितला. या देशातील कोणताही नागरिक ‘मी ब्राह्मण आहे’ किंवा ‘मी ब्राह्मणत्व स्विकारतो’ असे म्हणत असेल तर आमचा त्याला कोणताच आक्षेप नाही किंबहूना ब्राह्मण समाज त्याचे स्वागतच करेल. परंतू, निव्वळ राजकीय लोकप्रियता मिळविण्याकरीता, राजकीय लाभाकरीता कोणी नेता ‘‘मी ब्राह्मण आहे’’, असे विधान करीत असेल त्याला जाब विचारला जाईल. तो नेता ब्राह्मण असला तरीही त्यानी ब्राह्मण समाजाकरीता काय कार्य केले आहे याचा खुलासा केला पाहीजे. राजकीय लाभ उपटणार्‍या अशा विधानांनी हुरळुन न जाता आपण याचा वस्तुनिष्ठ्पणे विचार करायला हवा. ‘‘ब्राह्मण’’ अथवा ‘‘ब्राह्मणत्व’’ हा अस्मितेचा मुद्दा आहे, या मुद्यावरून केलेले राजकारण ‘‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ’’ कदापि सहन करणार नाही.
येत्या काही महिन्यांत ‘‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ’’ काही महत्वकांक्षी प्रकल्प राबविण्याची योजना आखीत आहे. त्या त्या वेळी कार्यक्रमांची घोषणा करण्यात येईल. आजपावेतो अ.भा.ब्रा.महासंघाच्या कार्याला आपण जसे सहकार्य केले आहे, तसेच सहकार्य या  कार्यक्रमांनाही लाभेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद !
                                                                                           
                                               


Sunday, 4 March 2012


नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या निकालांचा आढावा घेताना पुणे महापालिकेतील काही गोष्टी प्रामुख्यानी जाणवतात. जी राष्ट्रवादी कॉंगेस पार्टी, कॉंग्रेस(आय) मधील नेतृत्वाची पोकळी भरुन काढुन एकहाती सत्ता मिळवण्याची दावा करत होती, त्यांना दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरण जड गेले आणि परिपुर्ण यशानी त्यांना हुलकावणी दिली. ज्यांच्या कार्यकाळात हे घडले, ते मोहनसिंह राजपाल सपशेल पराभुत झाले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानी केलेल्या जाहीर आवाहनाला पुणेकरांनी मनापासुन प्रतिसाद देत श्री.राजपाल यांना मोठ्या फरकानी पराभुत केले, त्याबद्द्ल पुणेकरांचे आभार ! सर्वच पक्षांना यातुन योग्य तो संदेश गेलाच असेल. यापुढे ब्राह्मणविरोधी कारस्थाने कराल तर तुम्हालाही घरी बसवु, हा इशाराच मतदारांनी दिला. दुसरी महत्वाची गोष्ट, जे स्वःतला ब्राह्मण नेते मानतात त्यांनाही पराभुत केले. आपण काहीही केले तरी समाज ते मान्यच करेल, हा भ्रमाचा भोपळा फुटला. मतदारांनी ‘‘आपल्याला कोणीही गृहीत धरु नये’’, हाच संदेश यातुन दिला. जे ब्राह्मण नेते घराणेशाही रुजवु पहात होते तर कोणी पक्षविरोधी भुमिका घेत ब्राह्मण मतदारांना गृहीत धरुन आपली वेगळी चुल मांडण्याच्या प्रयत्नात होते त्यांनाही मतदारांनी दणका दिला. या निकालांकडे अनपेक्षित निकाल या दृष्टीकोनातुन न बघता सकारामत्क दृष्टीने बघितले पाहिजे. ब्राह्मण मतदारांनी आपले पुर्वमत बाजुला ठेवत अधिक व्यावहारिकपणे मतदान केले, पण मतदानाची अत्यल्प टक्केवारी मात्र अजुनही चिंतेचा विषय आहे. आपल्या मतानी काय घडु शकते हे आता लक्षात आल्यानंतर आता पुढील काळात मतदानाची टक्केवारी वाढवण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे हे ब्राह्मण मतदारांनी लक्षात घ्यायला हवे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संपुर्ण राज्यात जो भरभरुन पाठींबा मिळाला विशेषःत युवा वर्गाचा, त्यातुन जनतेला बदल हवा आहे, हेच अधोरेखित होते. विद्यमान राजकीय पक्षांमधे मतदारांना काही उणीव भासते आहे, काही तरी कमतरता भासते आहे. ती उणीव, ती कमतरता मनसेच्या माध्यमातुन भरुन निघेल अशी आशा मतदारांना वाटली. आजच्या युवकाला प्रचलित व्यवस्थेविषयी चीड आहे, नाराजी आहे. त्याला बदल हवा आहे. कोणत्याही नेत्यापेक्षा तो बदल घडवुन आणण्याची क्षमता त्याला राज ठाकरेंमधे दिसली, असेच या निकालांवरुन दिसते. तरुण वर्गात जसा ‘मनसे फॅटर’ चालला त्याचप्रमाणे ब्राह्मण मतदारांमधेही चालला. पुणे येथील आपल्या जाहीर भाषणात राज ठाकरेंनी दादोजी पुतळा प्रकरणावर आपल्या शैलीत प्रखर टिका केली आणि त्याचा परिणाम म्हणुन ब्राह्मण मतदारांनी भरभरुन आपले मत मनसेच्या पारड्यात टाकले. या निकालात ब्राह्मण मतदार मनसेकडे झुकल्याचे चांगलेच लक्षात येते. यातुन सर्व पक्षांनी योग्य तो बोध घ्यायला हवा. महाराष्ट्रात पार पडलेल्या महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकींकडे सर्वच राजकीय पक्ष 2014 साली होणार्‍या लोकसभा, विधानसभा निवडणुकीची उपांत्य फेरी म्हणुन बघत होते. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने या निवडणुकींमधे समाजबांधवांना अधिकाधिक उमेदवारी मिळावी, समाजबांधव राजकीय क्षेत्रात सक्रीय व्हावा, यासाठी सर्वच प्रमुख पक्षांशी संपर्क करुन या मागणीचा सातत्यानी पाठपुरावा केला. तसेच अधिकाधिक उमेदवार निवडुन यावेत यासाठीही प्रयत्न करण्यात आले.
मुंबई महापालिकेत तसेच ठाणे महापालिकेत सर्व पक्षांनी मिळुन सरासरी 5 टक्केच  उमेदवार दिले त्यापैकी 50 टक्के निवडुन आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसनी, शिवसेनेचे एकमेव ब्राह्मण खासदार आनंद परांजपे यांना आपल्याकडे वळविल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस आता अधिकाधिक ब्राह्मण कार्यक्रत्यांना उमेदवारी देईल, ही आशा फोल ठरली.
जवळपास सर्वच राजकीय पक्ष जातीय समीकरणांवर, त्या आधारावर उमेदवारी घोषित करुन, ‘‘समाज तोड आणि मत जोड’’, त्या तत्वानुसार व्यवहार करत असुनही स्वःतला ‘सेक्युलर’ म्हणवुन घेतात. या तत्वाला केवळ शिवसेना व मनसे आजही अपवाद दिसतात. पुणे महापालिकेत कॉंग्रेस(आय)ने केवळ दोन ब्राह्मण उमेदवार दिले पण त्यांनाही निवडुन आणण्यात कॉंग्रेसला यश मिळाले नाही. राष्ट्रवादी पार्टीचे जन्मस्थान असलेल्या पुण्यात पार्टीने 4 उमेदवार देऊन ब्राह्मण समाजाला जवळ करत असल्याचे चित्र ऊभे केले पण एकही उमेदवार निवडुन आणु शकले नाही. पुण्यातील एक ब्राह्मण नेते श्री.मोरेश्वर घैसास गुरुजी यांच्या धर्मपत्नी सौ. ऐश्वर्या घैसास यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देऊन ब्राह्मण समाजाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. ब्राह्मणबाहुल्य असलेल्या वेदभवन (बेचाळीस हजार मतदारांपैकी बावीस हजार ब्राह्मण)  प्रभागात सौ.घैसास यांना मतदारांनी नाकारले पण त्याचवेळी त्याच प्रभागातील पुरुष उमेदवार राष्ट्रवादीचेच श्री.बंडु केमसे यांना मात्र त्याच मतदारांनी निवडुन दिले. या प्रभागातील निकाल संपुर्ण राज्यातले मॉडेल ठरेल. भारतीय जनता पार्टीने 9 उमेदवार दिले त्यातील 5 निवडुन आले. मनसेनी 5 उमेदवार दिले त्यातील 2 निवडुन आले तर शिवसेनेने 2 उमेदवार दिले त्यातील 1 निवडुन आला. एकुणच मागील सदनातील 11 सदस्यांवरुन यंदा ब्राह्मण सदस्यांची संख्या 8 वर घसरली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत कॉंग्रेस(आय)ने 3 उमेदवार दिले, ते सर्वच पराभुत झाले. राष्ट्रवादी पार्टीने 2 उमेदवार दिले ते 2 ही निवडुन आले. शिवसेनेने 1 उमेदवार दिला पण तो पराभुत झाला. भारतीय जनता पार्टीने 1 उमेदवार दिला तो निवडुन आला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 4 उमेदवार दिले त्यापैकी 1 निवडुन आला. मागील टर्मला 3 ब्राह्मण सदस्य होते, ते आता चार झाले.
इतर शहरातील महापालिकांमधेही साधारण असेच चित्र आहे. सर्वच पक्षांनी जेमतेम 5 ते 6 टक्के ब्राह्मण उमेदवार दिले, त्यापैकी 50 टक्के निवडुन आले. या निवडणुकीत ब्राह्मण मतदारांनी चांगल्या प्रमाणात मतदान केले ही त्यातला त्यात समाधानाची बाब आहे.
समाजबांधवांचा राजकारणात समावेश करणे तसेच त्यांना सकीय करणे यासाठी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ नेहमीच प्रयत्नशील राहील व या क्षेत्रात आपला प्रभावशाली गट निर्माण करण्याचा प्रयत्न करेल.