श्री गणेशाच्या स्वागताची सर्वत्र
उत्साहानी तयारी सुरू असतानाच नुकतेच पुणे येथे पोलीसांनी तरूण-तरूणींच्या
मद्यधुंद पार्टीवर छापा घालून शेकडो तरूणांना अटक केली. हे सर्व विशी – पंचविशीतील
मुले आपला नोकरी- व्यवसायातील ताण घालविण्याकरीता (?) ही पार्टी करीत असल्याचे
सांगितले जाते. यापेक्षाही गंभीर प्रकार त्याच्या दोन दिवस आधी उघडकीस आला. तो
म्हणजे, शाळकरी मुलांची ‘‘फ्रेशर्स पार्टी’’ उर्फ ‘‘चिल्लर पार्टी’’. दहावीतील
विद्यार्थ्यांना निरोप देण्याकरीता या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याहुन
धक्कादायक बाब, या पार्टीत आठवी व नववी इयत्तेमधील विद्यार्थीदेखील सामील झाले
होते. एका पाठोपाठ एक घडलेल्या या घटनांमुळे जनमानस ढवळुन निघाले. समाजातील वाढती
व्यसनाधिनता हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. पाश्चात्य जीवनशैलीचे अंधानुकरण, बेधुंद
जीवनशैली, विभक्त कुटुंबामुळे नवरा/बायकोवर येणारा ताण याला कारणीभूत ठरत आहे.
दैनंदिन जीवनात भेडसावणार्या समस्यांना तोंड देण्यासाठी लागणारी कणखर मानसिकता
कमी पडते आहे. वाढती महागाई, वाढते शैक्षणिक खर्च याचा ताण विभक्त कुटुंबात जास्त
ताण येतो, तो निवारण्यासाठी दोघांनीही नोकरी / व्यवसाय करणे भाग पडते. परंतू,
यामुळे मुलांना वेळ देणे, त्यांच्याशी संवाद साधणे दोघांनाही शक्य होत नाही.
कुटुंबातला संवाद थांबलेला आहे. आपआपले ताण कुटुंबियांशी बोलुन मन मोकळे करून
त्यावर मार्ग काढणे, यापेक्षा अशा पार्ट्यांमधे सामील होण्याचा वेडेपणा मुलांकडून
घडतो. या समस्येवर मात करण्यासाठी शक्यतो एकत्र कुटुंब पध्दतीचा अवलंब करावा.
मुलांना पुरेसा वेळ द्यावा, त्यांच्याशी संवाद साधावा. केवळ चांगली शाळा, महागडे
क्लासेस, वारेमाप पैसे दिल्याने भागत नसून, मुलांची भावनिक गरज ओळखणे आणि ती पूर्ण
करणे, हे अत्यावश्यक आहे. सध्याची पिढी हुशार आहे, कर्तबगार आहे, ती यातून नक्कीच
मार्ग काढेल, याची खात्री आहे.
दरवर्षीप्रमाणे
यंदाही गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून हा उत्सव
साजरा करण्याच्या पध्दतीत काही सकारात्मक बदल होत आहेत, पण त्याचे प्रमाण अल्प
आहे. गणेश मंडळांकडून सकारात्मक कार्याची अपेक्षा समाजाला आहे. भव्य देखाव्यांची
महागडी स्पर्धा, कर्कश्य आवाजाची डॉल्बी साउंड सिस्टीम, दणकेबाज मिरवणुकीवर होणारा
भरमसाठ खर्च यासर्व खर्चांवर नियंत्रण आणून तो पैसा समाजहिताकरीता वापरावा, अशी
रास्त अपेक्षा आहे. काही मंडळांनी अशी सुरूवात केली असली तरी हे प्रमाण अत्यल्प
आहे. यात वाढ व्हावी व गणेशोत्सवाला त्याचे मूळ वैभव प्राप्त व्हावे.
दहशतवादी
घटनांच्या पार्श्वभूमीवर या उत्सवावर दहशतवादाचे सावट असणार आहे. सुरक्षा यंत्रणा,
गणेश मंडळ तसेच नागरिकांनी योग्य ती काळजी घेतल्यास, सावधानता बाळगल्यास अशा
घटनांना नक्कीच आळा घालता येईल. कार्य सिध्दीस नेण्यास श्री गजानन समर्थ आहेत.


No comments:
Post a Comment