Tuesday, 5 June 2012

संपादकीय जुन 2012


पाश्चात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव, स्वैर वागणुक, वाढते कौटुंबिक कलह, आंतरजातीय तसेच आंतरधर्मीय विवाह हे ब्राह्मणांपुढील आव्हाने असल्याचे समाजधुरीणांचे मत आहे. पण निव्वळ ढासळते सांस्कृतीक मुल्य हाच एकमेव प्रश्न नसून मानवतेला काळीमा फासणार्‍या कृत्यामधेही ब्राह्मणांचा सहभाग वाढतो आहे. नुकतेच एका पाहणीतून गंभीर आणि संतापजनक सत्य नुकतेच समोर आले. गत काही काळापासून ‘स्त्रीभ्रूण हत्या’ हा विषय ऐरणीवर आला आहे. काही लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संस्थांव्दारे याविषयी जनजागृती मोहीम सुरू आहे. याविषयावर जागृत ब्राह्मण वर्गात असा समज होता की हे प्रकार फक्त इतर जाती-धर्मात आहेत, ब्राह्मण यापासून दूर आहेत. पण नुकत्याच एका पाहणीत या समजाला प्रचंड मोठा आणि धक्कादायक तडा गेला. या पाहणीच्या अहवालानुसार काही काळापुर्वी ब्राह्मण समाजात अल्प असलेले स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण नुकतेच 30 टक्क्यांनी वाढले आहे. उच्च व कनिष्ठ वर्गापेक्षा मध्यम वर्गात याचे लोण प्रचंड वेगानी वाढते आहे. हा निष्कर्ष अत्यंत चिंताजनक आहे. निसर्गाचे संतुलन नाकारणारे आपण कोण ? स्त्री-पुरूष टक्केवारी, सामाजिक संतुलन, विवाहाच्या समस्या आदी सामाजिक समस्या काही काळ बाजुला ठेऊ, मानवतेला काळीमा फासण्यार्‍या अशा घटनांमधे आपला सहभाग आहे हे सत्यच फार बोचरे आहे. निदान ब्राह्मणांकडुन तरी ही अपेक्षा नक्कीच नाही.
या गंभीर प्रश्नावर आपण नुसते चिंता व्यक्त करून किंवा आपल्याच लोकांवर तोंडसुख घेऊन चालणार नाही. यावर उपाययोजना करावी लागेल. आपल्या लोकांना या विघातक मानसिकतेतून बाहेर काढावे लागेल. जेष्ठ तसेच तरूण पिढीने संयुक्त कुटुंब पध्दती स्विकारण्याची तयारी करावी. एक कुटुंब-एक मुल ही संकल्पना दिसावयास गोंडस असली तरी त्याचे व्यावहारिक तोटे लक्षात घ्यायला हवे. अपत्यांची संख्या वाढवणे हे व्यावहारिक शहाणपणाणे लक्षण खचितच नाही म्हणुनच मुलांचा सांभाळ करणे, मुलांवर संस्कार करणे, त्यांना शिस्त लावणे आदी बाबींसाठी संयुक्त कुटुंब पध्दीताचा पुनःश्च स्विकार करणे हितावह ठरेल. यातही काही अडचणी आहेत, हे मान्य, पण कुटुंबानी एकत्र बसुन यावर मार्ग काढता येणे निश्चितच शक्य आहे.
सुरूवातीला नमुद केल्याप्रमाणे पाश्चात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव, स्वैर वागणुक, वाढते कौटुंबिक कलह, आंतरजातीय तसेच आंतरधर्मीय विवाह आदी सांस्कृतिक मुल्य ढासळत असल्याचे निदर्शक आहे. त्यावर कौटुंबिक समुपदेशन हा एकमेव मार्ग आहे. त्याकरीता जुनी तसेच नवीन पिढी एकत्र येणे गरजेचे आहे. सांस्कृतिक मुल्य जपणे तसेच हीन मानसिकतेची अशी कृत्ये आपल्या समाजात रोखण्यास सर्वांनी एकत्र येत मार्ग काढावा. सध्याच्या काळात सर्वांनी एकत्र येण्याची मानसिकता ब्राह्मणांमधे जाणवते आहे ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. आजवर ब्राह्मणांनी अनेक आघात सहन केले आहेत. या संकटावरही आपण एकत्र येऊन निश्चितच मात करू याची खात्री वाटते.
                                               
                                                                                                                            

No comments:

Post a Comment